पुणे : ‘तुला कायमस्वरूपी वेतनश्रेणीवर कामावर घेतो’ असे म्हणून दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे तत्कालीन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने बंडगार्डन पोलिसांना दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशेला पाटील यांनी हा आदेश दिला.
डॉ. विधाते यांनी मुलीला कामासंबंधी चर्चा करण्यासाठी त्याच्या कार्यालयात बोलविले व तिचा विनयभंग केला. डॉ. विधाते सतत पैशाची मागणी करत. तसेच त्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार मुलीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती. बंडगार्डन पोलिसांनी ही तक्रार जिल्हा परिषदेतील विशाखा समितीकडे पाठवून त्याचा अहवाल मागितला होता.
मोबाईल घेत असताना डॉ. विधाते यांचा हात मुलीला लागला, असा अहवाल समितीने दिला होता. मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने मुलीने ॲड. तौसिफ शेख आणि ॲड. क्रांतीलाल सहाणे यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने डॉ. विधाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी. चौकशीचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.