मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात लहू बाबूराव लोखंडे या शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वळती येथील तागडेवस्ती येथे लहू बाबूराव लोखंडे हे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एकूण दहा शेळ्या आहेत. घराशेजारी असलेल्या जुन्या कौलारू शेळ्यांचा गोठा तयार केलेला आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. मध्यरात्री बिबट्याने घराच्या मागील बाजूकडून घरावर चढून कौलांमधून घरात प्रवेश केला व चार शेळ्या व दोन बोकडांना जागीच ठार केले. शुक्रवारी सकाळी लहू बाबूराव लोखंडे हे शेळ्यांना बाहेर काढण्यासाठी गेले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल विजय वेलकर, वनरक्षक शिवाजी दहातोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहेत. यापूर्वी येथून नजीक असलेल्या गाढवेवस्ती, काटवान वस्ती येथे बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, दुभती जनावरे, कुत्रे मारले आहेत.
या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग टाळाटाळ करत आहे असा आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात वनपरीक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या मंचर क्षेत्रात चार परीमंडळे असून चारही परिमंडळात बिबट्याचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठी मी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन पिंजरे उपलब्ध करून देणार आहे. पूर्वीचे अनेक पिंजरे नादुरुस्त असल्यामुळे ते वापरता येत नाहीत.