पुणे : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या तथाकथित वादग्रस्त वक्तव्यावरून सुरु झालेला वाद अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून एकीकडे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून काही संघटना पुढाकार घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे समर्थकही पुढे येऊन त्यांची पाठराखण करत आहेत. आता या वादात राष्ट्रीय वारकरी परिषदेने उडी घेतली असून त्यांनी इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय थांबण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर अंनिस आणि तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे असा इशाराही त्यांनी दिला.
एका वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आढळले आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था पुढे आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इंदोरीकर यांच्या समर्थनार्थही अनेक राजकीय नेत्यांसह महिलावर्गही पुढाकार घेत आहे. आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रीय वारकरी परिषदेने पत्रकार परिषद घेतली.
याबाबत महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान कोकरे महाराज म्हणाले की, 'इंदोरीकर महाराजांनी तळागाळातल्या वर्गात जाऊन समाज प्रबोधन केले, समाजसेवा केली. त्यामुळे आता जी काही लोकांची नौटंकी सुरु आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावरही वाद सुरु ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासमोर बोलण्याची विरोधकांची योग्यता नाही. आता देसाई आणि अंनिस थांबले नाहीत तर त्यांच्या स्वतःवर दाखल असलेले खटले आधी चालवावेत आणि मग इंदोरीकर महाराजांवर कारवाई व्हावी असेही त्यांनी स्पष्ट केले.