पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणातून अंगच काढून घेतल्याचे दिसून येत आहे. खुनाला १५ महिने उलटले तरीही याप्रकरणाचा छडा लागत नसल्याने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही अस्वस्थता मांडणार आहेत.ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून गेल्या १५ महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला कार्यकर्ते या पुलावर एकत्र जमत आहेत. डॉक्टरांच्या खुनाचा तपास पुणे शहर पोलिसांसह राज्यभरातील पोलिसांनी केला. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाकडे लक्ष घालण्याची विनंती केली जाणार आहे. गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले जाणार आहे. डॉक्टरांनी अंनिसच्या माध्यमातून ज्यांच्याविरुद्ध आंदोलने, चळवळी केल्या. त्यांच्या कामामुळे ज्यांना नुकसान पोहोचले अशा असंख्य व्यक्तींकडे पोलिसांनी खुनाचा तपास केला. तसेच, इतर अनेक शक्यताही त्यांनी तपासल्या मात्र खुनाच्या सूत्रधारापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. डॉक्टरांच्या विचाराला विरोध असणाऱ्या व्यक्तींकडूनच हा खून झाल्याचा संशय कार्यकर्त्यांना आहे. (प्रतिनिधी)
अंनिस मुख्यमंत्र्यांच्या दारी!
By admin | Published: November 20, 2014 4:21 AM