पुणे : अपेक्षेप्रमाणे ‘एआयएमआयएम’ने (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अनिस सुंडके ‘एमआयएम’चे उमेदवार असणार आहेत. ते बरीच वर्षे महापालिकेच्या राजकारणात होते.
पुण्यात ‘एमआयएम’चा उमेदवार देण्याचे राजकारण, असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकातच प्रसिद्ध केले होते. बुधवारी दुपारीच सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिम समाजाचा व्होट बँक म्हणून वापर केला. आता आम्ही समाजबांधवांना त्यातून बाहेर काढणार आहोत, आमची स्वतंत्र राजकीय ताकद आम्ही दाखवून देऊ, असे सुंडके यांनी सांगितले. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, तसेच राज्याचे सरचिटणीस अखिल मुजावर यांनी सांगितले, की आम्ही विचारपूर्वक पुण्यात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचा राजकीय वापर केला जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. राजकीय भूमिका घेतल्याशिवाय असा वापर थांबणार नाही, असे पक्षाचे मत आहे. त्यामुळे आम्ही गंभीरपणे ही निवडणूक लढवणार आहोत, असे मुजावर म्हणाले.