लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० जून रोजी ४६ महिने पूर्ण झाले आहेत तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला जामीन देण्यात आला आहे. फरार आरोपींना पकडण्यात अपयश आल्यामुळेच आरोपी जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसकडून २० जुलै ते २० आॅगस्ट २०१७ दरम्यान ‘जबाब दो’ आंदोलन राज्यात राबविले जाणार असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.शासनाच्या दिरंगाईबद्दल महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेऊन जाब विचारणार आहेत. येत्या संसदेच्या व विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्याची चर्चा करावी, अशी मागणी या लोकप्रतिनिधींकडे अंनिसकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाला जनतेने याचा जाब विचारावा असे आवाहन अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार यांनी केले आहे. सारंग अकोलकर, विनय पवार तसेच त्याचे साथीदार प्रवीण लिमकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून मडगाव बॉम्बस्फोटानंतर गेल्या ८ वर्षांपासून फरार आहेत. या दोघांना पकडण्यामध्ये दिरंगाई झाल्यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे खून झाले. या फरार लोकांना वेळीच अटक झाली असती तर हे तिन्ही खून टाळता आले असते अशी भावना अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.
अंनिसचे ‘जबाब दो’ आंदोलन
By admin | Published: June 21, 2017 6:19 AM