पुणे : मधमाशांचे पोळ अनेक ठिकाणी दिसते, पण अंजन माशीचे क्वचित पहायला मिळते. परंतु, मधमाशी आणि अंजन माशी यामध्ये खूप फरक आहे. मधमाशा मध तयार करू शकतात, पण या अंजन माशा करू शकत नाहीत. उलट मधमाशांसाठी या अंजन माशा धोकादायक आहेत. कारण मधमाशा, मुंग्या हेच यांचे भक्ष्य आहे. भुकूम गावातील एका घरामागे उंबराच्या झाडावर हे घर बनवले आहे. अतिशय सुंदर असे डिझाइन असले, तरी त्यांचे वागणे आणि चावा अतिशय वेदनादायी असा आहे.
काळ्या-पिवळ्या रंगाच्या या अंजन माशा असतात. यांची कॅालनी सुमारे १० हजार माशांची असू शकते, तर मधमाशांची ७५ हजारच्या जवळपास असते. सर्वसाधारण मधमाशीपेक्षा आकाराने मोठी असलेली अंजन माशी ही मधमाशी, मुंग्या अशा छोट्या किटकांना खाऊन टाकतात. यांचा चावा अतिशय वेदनादायी असतो. या माशीने चावा घेतल्यानंतर दोन-तीन दिवस त्रास सहन करावा लागतो. तसेच त्वचेला खड्डा पडल्यासारखे होते. एखाद्या झाडावर त्या आपले लंबाकृती घर तयार करतात. त्यामध्ये विविध कप्पे करून राहतात. दिवसभर बाहेरून खाद्य आणून सायंकाळी त्या घरात राहतात. झाडावरील साल आणि डिंकाने त्या त्यांच्या घरावर शिंपल्यासारखे डिझाइन तयार करतात. कोणताही किटक त्यांच्याकडे गेला की, त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे घराशेजारी यांचे घर असेल, तर ते धोकादायक ठरते, असे मधमाशा अभ्यासक विजय महाजन यांनी माहिती दिली.
या माशांचा मधमाशांपेक्षा मोठा आकार असतो. इंग्रजीत याला wasp म्हणतात. आपल्या डोळ्यांत अंजन घातल्यावर जशी आग होते, तशी या माशांच्या चावा घेतल्याने होते. म्हणून त्यांना अंजन माशी असे म्हटले जाते.
- विजय महाजन, मधमाशा अभ्यासक