थेऊर : पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजू गुलाब गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंचपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये कैलास प्रमोद तुपे हे निवडून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. सराफ यांनी दिली. यावेळी सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी काम पाहिले.
कुंजीरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत माजी सरपंच सचिन तुपे तसेच श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक संदीप धुमाळ व माजी सरपंच संतोष कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने नऊ जागांवर विजय मिळवला. तर ज्योतीर्लिंग ग्रामविकास आघाडीचे तीन, संघर्ष परिवर्तन आघाडी तीन, श्री चिंतामणी नवनाथ महाराज ग्रामविकास पॅनेलचा एक आणि श्री चिंतामणी ग्रामविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाले. सरपंच पदासाठीच्या जागेसाठी हरेष गोठे यांचे नाव चर्चेत असताना अचानक झालेल्या राजकीय बदलांमुळे पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले होते. परंतु येणाऱ्या काळात कुंजीरवाडीतील राजकारणात होणाऱ्या बदलांकडे सर्वसामान्य लोक लक्ष देऊन आहेत.