हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी मिळविला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:55 PM2019-06-24T12:55:58+5:302019-06-24T12:56:40+5:30
नुकताच सक्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या अंकिता पाटील यांना राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे.
इंदापूर - काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागेवरुन त्या 17 हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. 23 जून रोजी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
नुकताच सक्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या अंकिता पाटील यांना राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे. पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या कन्येच्या प्रवेशामुळे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी धावपळ करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीनेही जाहीर पाठींबा दिला होता.