सतीश सांगळे
कळस (जि.पुणे): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपत प्रवेश केला. मात्र, त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी पक्षांतर बंदी कायद्यामुळे प्रवेश टाळला आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे मध्ये सात सदस्य आहेत. यामध्ये अंकिता यांचा समावेश आहे. इंदापूर पंचायत समितीमध्ये आठ सदस्य काँग्रेस पक्षाचे आहेत. सर्व पाटील समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण नाही. पाटील यांच्या भाजपप्रवेशाने जिल्हा परिषदेत पाटील समर्थक सदस्यांची अडचण निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होऊनही अंकिता यांना स्थायी समितीपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांची कोंडी होणार आहे. आगामी निवडणुकीत मनाने व ताकदीने हर्षवर्धन यांच्याबरोबर असल्या तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांना काँग्रेस पक्षाचे राहावे लागणार आहे.२०१६ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांसाठी पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. एखादा पक्षातून निवडून आल्यावर त्याला त्याच पक्षात राहावे लागते. अन्यथा त्याला अपात्र घोषित केले जाते व सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही.अपात्रतेच्या काळात त्याला कोणतेही लाभाचे पद मिळणार नाही. जिल्हाधिकारी,आयुक्तांना एक वर्षाच्या आत अपात्रतेवर निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.