आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी ‘श्रीं’च्या अश्वांचे प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून सोमवारी (दि. २५) हरिनाम गजरात झाले. या प्रसंगी ‘श्रीं’च्या महानैवेद्यासाठी चांदीचा चौरंग-पाट मानकरी योगेश आरू यांनी सुपूर्त केला.अश्वसेवेचे मालक मानकरी श्रीमंत सरकार महादजीराजे शितोळे (अंकलीकर), ऊर्जितसिंह शितोळे सरकार, श्रीमंत सरकार कुमार महादजीराजे शितोळे (अंकलीकर), पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर पवार, स्वामी सुभाषमहाराज, माऊली देवस्थानाचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी, ‘श्रीं’चे अब्दागिरीचे मानकरी योगेश आरू, नचिकेत पाठक आदींसह अंकलीकर ग्रामस्थ, वारकरी व दिंडीकरी उपस्थित होते.संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जाऊन अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला. या वेळी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यात महानैवेद्याचे मानकरी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्याकडे सोहळ्यात ‘श्रीं’चा नैवेद्य ठेवण्यासाठी येथील ‘श्रीं’च्या सोहळ्यातील अब्दागिरी सेवेचे मानकरी योगेश आरू यांनी भेट दिलेला वैभवी चांदीचा चौरंग आणि पाट सरकार यांच्याकडे सन्मानपूर्वक मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.मांजरीवाडीत ‘श्रींच्या अश्वांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. या वेळी अश्वांचे दर्शन करण्यास भाविकांनी गर्दी केली. श्रीमंत शितोळे सरकार यांच्यासमवेत चर्चा करून पालखी सोहळ्याच्या नियोजनबाबत मालक बाळासाहेब आरफळकर यांनी माहिती दिली.अंकलीतील राजवाड्यातील अश्वांच्या प्रस्थानापूर्वी अंबाबाई देवीची पूजा, आरती, ‘श्रीं’च्या अश्वांची पूजा, ध्वजपूजा, अंकलीकर राजवाड्यात आणि श्री विठ्ठल मंदिरात अश्वांची मंदिर प्रदक्षिणा तसेच ग्राम नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. अंकली परिसरातील ग्रामस्थ आणि दिंडीप्रमुख वारकरी या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी महाप्रसाद वाटप करण्यात आले. ‘श्रीं’च्या अश्वांचा वैभवी प्रस्थान सोहळा अंकलीकर श्रीमंत शितोळे सरकार यांनी प्रथापरंपरांचे पालन करीत उत्साहात पार पडला.अंकली गावातील राजवाड्यातून ‘श्रीं’च्या अश्वांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. आळंदीकडे प्रवास करून पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘श्रीं’चे अश्व आळंदीत ५ जुलैला आगमन करतील. पुण्यनगरीतील दि. ३ व ४ जुलै असा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन ‘श्रीं’चे अश्व ‘श्रीं’च्या वैभवी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी आळंदीला दि. ५ जुलै रोजी हरिनाम गजरात पोहोचतील. येथील वेशीवर ‘श्रीं’च्या अश्वांचे आळंदी देवस्थान आणि सोहळ्यातील प्रथापरंपरांचे पालन करीत स्वागत करण्यात येईल.
....................११ दिवसांचा होणार प्रवास पुणे ते आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेश बिडकर यांच्या परिवाराच्या वतीने स्वागत होणार आहे. ११ दिवसांच्या प्रवासानंतर ‘श्रीं’चे अश्व आळंदी मंदिरात पूजा, दर्शन, स्वागत झाल्यानंतर येथील फुलवाले धर्मशाळेत मुक्कामी राहणार आहेत. श्री ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याच्या वतीने आळंदीत मालक बाळासाहेब आरफळकर पवार आणि आळंदी देवस्थानाच्या वतीने अश्वांचे आगमन झाल्यानंतर संस्थानाच्या वतीने परंपरेने स्वागत होईल.‘श्रीं’च्या अश्वांचे प्रवास नियोजन श्रीमंत सरकार ऊर्जितसिंह शितोळे अंकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेने होणार आहे.