पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना एका जाती किंवा लाल, निळा, भगवा अशा कोणत्याच रंगात समाविष्ट करू नका, अण्णा भाऊ साठे यांनी शाळा पूर्ण न करताही संपूर्ण जगाला उमगेल आणि उमजेल असे वैश्विक तत्त्वज्ञान त्यांच्या साहित्यातून मांडले, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या आणि अण्णा भाऊ यांच्या साहित्यातील विचार आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या लोककलाकारांचा सत्कार सबनीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते.
या वेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर, काँग्रेस सदस्य मिलिंद अहिरे, स्थायी समिती सदस्या पुणे मनपाच्या नगरसेविका लता राजगुरू, कुणाल राजगुरू, सागर काकडे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट होते आणि काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे सख्य नव्हते तरी सर्व इझमच्या भिंती ओलांडून अण्णा भाऊ साठे यांनी त्यांनी मांडलेल्या मानवतावादी भूमिकेमुळे सर्वांना आपलेसे केले होते. केवळ डफलीवरील थापेने अण्णा भाऊ साठे यांनी अवघा महाराष्ट्र चेतवला आणि प्रेरित केला. मानवतेच्या आणि भावनेच्या धाग्याने अण्णा भाऊ साठे यांनी मानवजात गुंफली.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर आदी मान्यवरांनी देखील अण्णा भाऊंच्या साहित्याचा परामर्श घेतला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागप्रमुख विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.