लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात हाताला काम धंदा नसलेल्यासह रस्त्यावरील गोरगरीब लोकांसाठी शासनाची शिवभोजन थाळी पुणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने अन्नापूर्णा ठरली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात ७४ शिवभोजन केंद्र असून, सर्व केंद्र चालकांना गेल्या पंधरा दिवसांपर्यंत अनुदान वाटप करण्यात आले आहे.
राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. पुणे जिल्हयात १५ एप्रिल २०२१ पासून १० मे २०२१ अखेर ७४ केंद्रातून एक लाख ९३ हजार २५३ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराधारांसाठी मोफत जेवण देण्यात आले.
--------''
पुणे जिल्हयात शिवभोजन थाळींची तालुकानिहाय संख्या, कंसात शिवभोजन केंद्र
आंबेगाव-१४,५९९(४), जुन्नर-१६,३७७ (७), खेड-८,३९० (६), मावळ-१५,१७६ (६), मुळशी-८,०१२ (७), शिरूर-११,०३६(५), भोर-१४,९७९ (३), पुरंदर-१९,६०९ (४), वेल्हे-३६३६ (१), दौंड-१०,०६३ (५), बारामती-३०,९८६(१३), इंदापूर-१५,९०१(५), हवेली-२४,४९० (८) अशा एकूण ७४ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून १ लाख ९३ हजार २५३ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
----------------
जिल्ह्यातील कोरोना काळात गरीब, रस्त्यावरच्या भुकेलेल्या लोकांसाठी शिवभोजन थाळी खऱ्या अर्थाने आधार ठरली. जिल्ह्यात दररोज हजारो लोकांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत अन्न वाटप करण्यात आले. यामध्ये सर्वच शिवभोजन केंद्र चालकांचा मोठा वाटा आहे. यासाठीच जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्यात सर्व शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान वेळच्या वेळी काढण्यात येते. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपर्यंत अनुदान देण्यात आले आहे.
- उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
------
प्रति थाळी ग्रामीण भागात ३५, तर शहरी भागात ५० रुपये अनुदान
शासनाने शिवभोजन थाळीसाठी केंद्र चालकांना ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३५ रुपये, तर शहरी भागासाठी नगरपालिका हद्दीसह प्रति थाळी ५० रुपये अनुदान देण्यात येते. सध्या लोकांना पूर्ण पणे मोफत जेवण दिले जात असल्याने केंद्र चालकांना शंभर टक्के अनुदान शासनच देते.
-------
एका शिवभोजन थाळीत काय असते
शासनाने शिवभोजन थाळीचे दर आणि थाळीत काय दिले पाहिजे आणि किती प्रमाणात अन्न दिले पाहिजे हे निश्चित केले आहे. यात एका शिवभोजन थाळीत दोन पोळ्या, भाजी, वरण - भात असे पूर्ण जेवण असते. अनेक केंद्रावर लोकांच्या मदतीने, वाढदिवसानिमित्त मिष्ठान्न जेवणदेखील दिले जाते.
---------------