सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेसलगच्या दुष्काळाने गावे तर मोडून पडली आहेतच, पण ज्ञानाच्या दिव्याने अंधारलेल्या परिस्थितीवर प्रकाश शोधणाऱ्या विद्यार्थ्यांवरही संकट कोसळले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दररोज पोटभर जेवण करणेही शक्य होईनासे झाले आहे. एक वेळचेच जेवण तेदेखील मैत्रिणींसोबत डबा शेअर करून घेणेच त्यांना परवडत आहे. लातूर, नगर, सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील या विद्यार्थिनी आहेत. सगळ्या जणी पोस्ट ग्रॅज्युएशन करीत असून, त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. आत्तापर्यंत आई-वडील पोटाला चिमटा काढून कसेबसे पैसे पाठवीत होते. पण, दुष्काळाने त्यांनाच मोडून टाकल्याने घर चालविण्याची पंचायत. त्यामुळे मुलीला उचलून पैसे देणेच शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचे हाल सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काकणेवाडीची संगीता वाळुंज एमएससी स्टॅटिस्टिक्स करत आहे. मागील वर्षी ८९ टक्के गुण मिळविले; मात्र खुल्या प्रवर्गात असल्याने शिष्यवृत्ती नाही. त्यामुळे घरून येणाऱ्या पैशावरच शिक्षण घ्यावे लागत आहे. संगीता म्हणाली, ‘‘गावाकडे सलग तीन वर्षांचा दुष्काळ आहे. वडिलांची पोटापुरती शेती... पण त्यातही काही उगवले नाही. त्यांनाच घर चालवायची भ्रांत, तर मी पैसे कसे मागायचे. त्यामुळे मी एक वेळच जेवण करते. भूक लागली तर मैत्रिणीच्या डब्यात शेअर करतेय.’’ श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमालाची वैशाली मुल्ला रसायनशास्त्रात एमएससी करतेय. गेल्या वर्षी ८१ टक्के गुण मिळाले. तिलाही दुष्काळामुळे गेल्या काही दिवसांपासून पैसे येणेच बंद झाले. होस्टेलची फी भरायलाही पैसे नाहीत... एक वेळ जेवण करून दिवस काढायचे. संगीता आणि वैशालीसारखीच अनेकींची स्थिती आहे. पुण्यात रहाणे, जेवण व किरकोळ खर्चच ३ ते ४ हजाराच्या घरात जातो. त्यात परीक्षा फी, प्रोजेक्ट, नोट्स, पुस्तके याचा खर्च वेगळा येतो. तो टाळता येत नाही. त्यामुळे एक वेळ जेवण करूनच पैसे वाचवावे लागतात.
ऐन दिवाळीत दुष्काळाने हिरावला त्यांचा भाकरीचा चंद्र
By admin | Published: November 10, 2015 1:54 AM