पुणे : राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बी.एड., बी.पीएड. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. मात्र, या तारखा संभाव्य असून लोकसभा निवडणुकीमुळे या तारखांमध्ये बदलही होऊ शकतो, असे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी सीईटी सेलकडून या तारखा चार ते पाच महिने अगोदर जाहीर केल्या जातात. मात्र, यंदा प्रवेशपरीक्षांच्या काळातच लोकसभा निवडणुका पार पडण्याची शक्यता असल्याने याबाबतचे नियोजन करणे सीईटी सेलसाठी अवघड बनले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांनी तारखा जाहीर केल्या असून, त्याच वेळी या तारखा केवळ संभाव्य असून, निवडणुकांच्या तारखांनुसार यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एमबीएची प्रवेशपरीक्षा ९ व १० मार्च २०१९, विधी अभ्यासक्रम (५ वर्षे) २१ एप्रिल, विधी अभ्यासक्रम (३ वर्षे) ११ मे, एमएचसीईटी २ मे ते १३ मे, बी.एड. (३ वर्षे) २२ मे आदी तारखांना प्रवेशपरीक्षा पार पडणार आहेत. परीक्षेच्या काही दिवस अगोदर प्रवेशपरीक्षांच्या अंतिम तारखा तसेच कोणत्या तारखेला अर्ज भरायचे याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:16 AM