लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी व परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी बनावट वेबसाईट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर करत पैसे उकळले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.
न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी ३० डिसेंबरपर्यंत वाढवली. चाैकशीत सावरीकर उडवाउडवीची उत्तरे देत आहे. सुपे याने त्याच्या नातेवाईक व परिचितांकडे काही रक्कम दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सुपे याच्या कार्यालयातील इतर कोणी साथीदारांनी आरोपीला मदत केली आहे का, याबाबत तपास केला जाणार आहे. या गुन्ह्याची तयारी पूर्वनियोजित होती. त्यामध्ये राज्यातील एजंट, अकादमीचालक यांनी मदत केली का, याचीही तपासणी केली जात आहे, असे पोलिसांनी नमूद केले आणि आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलानी केली.