पुणे : शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ अप्पा यांचा जन्मदिन नुकताच ८ जुलै रोजी झाला. या निमित्ताने ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ साजरा करण्याची घोषणा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली.
महासंघाने गोनीदांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गोनीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठ जुलै हा दिवस यापुढे ‘गोनीदा दुर्गवारी दिन’ म्हणून महासंघ साजरा करणार असल्याची घोषणा केली. गोनीदांनी केलेले दुर्गसंस्कार, किल्ले पाहण्यासंदर्भात त्यांनी दिलेली दृष्टी याबद्दल अॅड. आनंद देशपांडे यांनी विचार मांडले.
गोपाळ नीळकंठ दांडेकर (अप्पा) म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केले असेल, तर ते किल्ल्यांवर. या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांतसुंदर पुस्तके लिहिली. हजारो वाचकांना या पुस्तकांमधून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली.
ऑनलाईन दुर्गवारी दिनानिमित्त अभिनेत्री आणि गोनीदांची नात मृणाल कुलकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दुर्गभ्रमण अन किल्ल्यांविषयीच्या जागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग व्हावा. पुढच्या पिढीकडे हा वारसा डिजिटल आणि दृकश्राव्य पद्धतीने पोहोचावा, असे त्यांनी सांगितले. गोनीदांची कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितले, “गोनीदा हे फक्त गडकोटांवर भटकंती करत नव्हते तर त्या गडकोटांवर राहणारे सारेच त्यांच्या घरचे झाले होते. एकटे आप्पा जरी किल्ल्यावर असले तरी किल्ला भरल्यासारखा वाटतो, ही भावना या ‘गडकरीं’ची असे आणि म्हणून हे गडकिल्ले मला माझ्या माहेरासारखेच आहेत.” नीलेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हृषीकेश यादव यांनी आभार मानले. देशविदेशातून पाचशे लोकांनी या वेबिनारला उपस्थिती लावली.
चौकट
“केवळ पिकनिकसाठी म्हणून किल्ल्यांवर न जाता त्याचा इतिहास आणि भूगोल समजून घेऊन किल्ले पाहावेत. त्यामुळे आपल्या किल्ल्यांचे आणि पर्यायाने इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. किल्ले ही धारातीर्थे आहेत. ती फक्त पर्यटनस्थळ होऊ नयेत यासाठी गोनीदांचे साहित्य संस्कार महत्त्वाचे आहेत.”
-अॅड. आनंद देशपांडे