लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाची टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर झाली आणि सगळे शहर जणू कोमातच गेले होते. बंद दुकाने, ओस रस्ते, निर्मनुष्य चौक, गल्लीबोळ आणि जोडीला आठवणही नको वाटावी अशी जीवघेणी शांतता... हसत्या खेळत्या पुण्याला कोमात नेणाऱ्या टाळेबंदीला वर्ष झाले आहे. कोरोनाची भीती अजूनही कायमच आहे, पुन्हा ती वाढू लागली आहे. पण तरीही कोणालाच ती क्रुर, जीव घेणारी आणि सगळे चलनवलन बंद पाडणारी टाळेबंदी नको आहे.
कष्टकरी पुण्यालापुर्व भागात याचा सर्वाधिक फटका बसला तरी नोकदारांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यावर परिणाम झाला. हातावरचे पोट असलेले विडी कामगार, वडापाव सारख्या पदार्थांच्या गाड्या लावणारे, बुट पॉलिश, फिटरकाम करून घर चालवणारे, रिक्षावाले, मोलकरणी, फुलविक्रेते असे सगळे गरीब कष्टकरी समाजघटक टाळेबंदीत रगडून निघाले. किमान ७ ते ८ लाख गरीबांची रोजीरोटीच कोरोनाने हिसकावली.
नोकरदारांची कार्यालयेच बंद झाली. त्यांनाही घरात बसावे लागले. कामच नाही, म्हणून ऊत्पादन नाही, म्हणून पगारही नाही यातून तेही बेरोजगार झाले. काहींच्या पगारावरच संक्रात आली. कर्जाचे हप्ते डोक्यावर बसले. शिल्लक घर चालवायला खर्ची पडू लागली आणि संपलीही. २ ते ४ लाख असे बेकाम झाले.
व्यापाऱ्यांची दुकाने बंद रािहल्याने तेही बेजार, वैद्यक व्यावसायिकांचीच काय ती या काळात बरकत होती. मात्र त्यालाही करूणेची किनार होती. रूग्णालयात जागा नाही, कुठे ऑक्सिजन सिलेंडर नाही, कुठे वेळेवर रूग्णवाहिकाच मिळाली नाही म्हणून अनेकांचे जीव गेले. किराणा दुकानात गर्दी ऊसळायची कारण त्यांनाही वेळेचे बंधन होते. वर्ष झाले तरीही सगळे कसे कालच झाले असावे असे अजूनही अनेकांना वाटते. तशीच वेळ पुन्हा आल्याचे दिसू लागल्याने चिंतेत भरच पडू लागली आहे.काळजी घेऊ, नियम पाळू पण लॉकडाऊन नको अशीच नागरिकांची मागणी आहे.