लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चौदाव्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघात पुण्यातील आयंती धांदाडे, आयुषा इंगवले, रिषी वुरा, विश्वराज इंगवले यांची निवड करण्यात आली आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद येथील एसएजी स्पोर्टस् कॉम्लेक्स खोखरा येथे २१ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.
नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ८ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर आणि वरिष्ठ सॉफ्ट टेनिस २०२१ स्पर्धेत आयुषी, आयंती आणि रिषी बुरा यांनी चमकदार कामगिरी केली होती. पुण्याच्या आयुषा इंगवले हिने सब-ज्युनिअर गटामध्ये रौप्यपदक मिळवले. वरिष्ठ गटात आयुषाने सुवर्णपदक मिळवले. अयाती दांदडे हिने सब-ज्युनिअर गटात आणि वरिष्ठ गटात रौप्यपदक मिळवत दोन पदकांची कमाई केली. रिषी वुरा याने वरिष्ठ गटात कांस्यपदक मिळवले.
जळगावातील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेतर्फे घेण्यात आली. यात पुण्यासह जळगाव, बुलढाणा, मुंबई, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद आणि सोलापूर या दहा जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.