पुणे : दिवंगत प्रकाशक सुनील मेहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेल्या प्रथम सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारांची घोषणा बुधवारी (दि.३) करण्यात आली. कादंबरी विभागात प्रदीप कोकरे यांची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ सर्वोत्कृष्ट कादंबरी, तर कथासंग्रह विभागात प्रमोदकुमार आणेराव यांचा ‘झुरळ आणि इतर काहीबाही’ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. १२ जानेवारी रोजी एस.एम.जोशी सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होईल, असे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले.
पुण्यातील नामांकित प्रकाशन संस्था 'मेहता पब्लिशिंग हाऊस' तर्फे यावर्षी मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांच्या ' स्मृतिप्रीत्यर्थ ' यावर्षी २०२४ पासून ' प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कार ' देण्यात येत आहे. नवलेखकांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रथम प्रकाशित साहित्याचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. कादंबरी आणि कथासंग्रह अशा दोन विभागात हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे स्वरूप सर्वोत्कृष्ट कादंबरी रु.३०,०००/- आणि मानचिन्ह व सर्वोत्कृष्ट कथासंग्रह रु.२०,०००/- आणि मानचिन्ह असे आहे. या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट कादंबरी विभागात लेखक प्रदीप कोकरे लिखित ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीची निवड करण्यात आली असून प्रमोदकुमार आणेराव यांचा ‘झुरळ आणि इतर काहीबाही’ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका उमा कुलकर्णी आणि शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील प्राध्यापक, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होतील. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२४ रोजी ' एस.एम.जोशी सभागृह,' पुणे येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे सत्तर कथासंग्रह आणि तीस कादंबरी पुरस्कारासाठी आल्या होत्या. त्यातून तज्ज्ञ परीक्षकांनी निवड केली. १ जानेवारी २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रकाशित झालेल्या कथासंग्रह आणि कादंबरींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या पुरस्कारासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. केवळ प्रथम प्रकाशनाची अट आहे. मराठी साहित्यात ललित लेखनात होणारे नवे प्रयोग पुरस्कृत व्हावे आणि नवलेखकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतून महाराष्ट्रभरातील सर्व प्रकाशनांच्या पुस्तकांसाठी हा पुरस्कार खुला ठेवला आहे. या पुरस्काराचे मानचिन्ह ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. हे मानचिन्ह वाचकांचाही सन्मान करणारे असून विशेष थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानासह ते साकारण्यात आले आहे.