पुणे : जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यात मावळ तालुक्यातील ७, खेड मधील ४, मुळशी, हवेली, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी २, तर दौंड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच तीन सरपंचांच्या रिक्त पदासाठी थेट निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगातर्फे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.त्यात येत्या एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यानुसार मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण,शिलाठणे,औंढे खु.,ओझर्डे,वराळे, टाकवे खु. या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत.तसेच खेड तालुक्यातील बोरदरा,पाईट,कोये,खालुंर्बे आणि मुळशीतील चांदिवली आणि पिरंगुट ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.त्याचप्रमाणे हवेलीतील वडगाव शिंदे,होळकरवाडी आणि इंदापूरमधील सुरवड,शेटफळहवेली तसेच आंबेगावमधील देवगाव आणि वडगाव पीर येथील निवडणूकांचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला आहे.
एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधी मध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची नोटीस येत्या २२ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांकडून प्रसिध्द करण्यात येणार आहे.येत्या ५ मार्च ते ९ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र (अर्ज)मागविण्यात येतील.अर्जांची छाननी 11 मार्च रोजी केले जाईल आणि १३ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल.तसेच १३ फेब्रुवारी रोजीच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.या जागांसाठी २४ मार्च रोजी मतदान घेवून पुढील दोन ते तीन दिवसात निकालाचा दिनांक जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार प्रसिध्द केला जाईल.लोकसभा निवडणुकीच्या आधीच या गावात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.थेट निवडणूकीद्वारे निवडणूक देणाºया सरपंच पदामध्ये भोर तालुक्यातील दापकेघर ग्रामपंचायत, आंबेगावमधील नागापूर ग्रामपंचायत आणि जुन्नरमधील सुलतानपूर ग्रामपंचायतीचा समावेश आहे.यातील दोन ग्रामपंचातीवर मागास प्रवर्गातील स्त्री आणि एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गातील उमेदवार निवडूनजाणार आहे.