पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या प्रवेशात पुन्हा गोंधळ होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. डिसेंबर २०१५ पासून आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत विविध तर्क लढविण्यात येत होते. ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र शासनाकडून शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई झाल्याने आता मार्चमध्ये प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील महिनाभराच्या काळात शाळा नोंदणी, पालकांनी करावयाचे अर्ज आणि सोडत पद्धतीने प्रवेश हे करावे लागणार आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळावर मात करण्यासाठी यंदा प्रथमच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक विभागात शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि गोंधळ न करता केली जावी व सर्व वॉर्ड पातळीवर सक्षम सहायक अधिकारी कक्ष नेमून पालकांना आॅनलाइन प्रक्रिया साह्य करावे. शाळांचे रजिस्ट्रेशन करून आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आवश्यक असणारी कागदपत्रे. रहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोनबिल, घर- पट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे), कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (मार्च २०१५ अखेरचे १ लाखापेक्षा कमी असलेले), जन्माचा दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक अधिसृूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य आहेत.
आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: February 28, 2016 3:48 AM