लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा झालेल्या कैद्यांना काम पुरविले जाते. त्यातून दरवर्षी साधारण ६ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कोव्हीडमुळे गेल्या वर्षभरात मागणी कमी झाली तरी तब्ब्ल ३ कोटींची उलाढाल येरवडा कारागृहातून करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सुतारकाम आणि टेक्सटाईलला चांगली मागणी आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील महत्वाचे व सर्वात जुने कारागृह आहे. कारागृहात शिक्षा झालेल्या ४०० बंद्यांना रोटेशेननुसार काम दिले जाते. त्यात प्रामुख्याने सुतारकाम, लोहार काम, शिवणकाम, हातमाग, टेक्सटाईल, बेकरी, चर्मकाम हे उदयोग केले जातात. त्यात सुतार कामामध्ये सागवानी लाकडाच्या खिडक्या, दरवाजे यांना मागणी असते.
कोरोना काळात ३ कोटींची कामे
कोरोना काळात येरवडा कारागृहामार्फत चालविणारी बेकरी उत्पादने, सलून ही बंद ठेवावी लागली होती. दरवर्षी येरवडा कारागृहातील ६ ते ७ कोटींची उलाढाल होते. यंदा कोरोना काळात ३ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. कारागृहातील हातमाग विभागातील पैठणीला नेहमीच चांगली मागणी असते. असे नामवंत येथून पैठणीची ऑर्डर देऊन बनवून घेतात. कोरोना काळातही १० पैठणींची निर्मिती करुन त्यातून १ लाखांहून अधिक उत्पन्न मिळविण्यात आले.
येरवडा कारागृहात बायोगॅस प्लॅट बसविण्यात आला असून त्यावरच सर्वांचे जेवण बनविले जाते. त्यातून महिन्याला ३ लाख रुपयांची बचत होत आहे. कारागृहाच्या परिसरात भाजीपाला, अन्नधान्य खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही ऋतुत पिके घेतली जातात. गहू, भात, ज्वारी, सोयाबीन, टिश्यू केळी व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यातून कारागृहातील अन्नधान्य, भाजीपाल्याची गरज भागविली जाते. कारागृहात हंगामानुसार फळभाज्या पिकविल्या जातात.
येथे नुकताच शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. तसेच महिला बंदींकडून अगरबत्ती, शिवणकाम करुन घेतले जाते. दुचाकीला लागणारे की सेटचा सांगाडा बनविण्याचे प्रशिक्षण २० महिलांना देण्यात आले आहे.
येरवडा कारागृहाबाहेरच कारागृह वस्तूंचा विक्रीचा स्टॉल उभारण्यात आला आहे. तेथे कारागृहात उत्पादित होणार्या वस्तूंची विक्री केली जाते.
अडचणीच्या काळात चांगले काम
कोरोना काळात बाहेरचा सर्व संपर्क बंद असताना कारागृहात विविध उत्पादनामधून सुमारे ३ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच बंद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
यु. टी. पवार, कारागृहा अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह.
येरवडा कारागृहातील एकूण कैदी - ५९९४
पुरुष - ५६९४, महिला - २५४
तातडीच्या पॅरोलवर बाहेर असलेले कैदी - ७७
शिक्षा झालेले कैदी - ८००