लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : बालविकास अधिकाऱ्यांच्या चातुर्याने पोलिसांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले. दूरध्वनीवरून मिळालेल्या माहितीद्वारे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठोस पुरावे गोळा करून हा बालविवाह होणार असल्याचे पोलिसांना पटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी विवाह रोखण्यास मदत केली.हडपसर गाडीतळावरील महात्मा फुले वसाहतीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा बोपोखेल येथील मुलाशी एका मंगल कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता विवाह होणार आहे, असे एका निनावी दूरध्वनीवरून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विवाह रोखण्यासाठी मुलीची जन्मतारीख शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अंगणवाडीमधील रजिस्टरमध्ये त्या मुलीचा २००१मध्ये जन्म झाल्याची नोंद मिळाली. मात्र, त्या मुलीच्या घरच्यांनी महापलिकेतील जन्माचा दाखला सादर करून ती सज्ञान असल्याचे सिद्ध केले. त्यामध्ये जन्मसाल १९९८ असे लिहिलेले होते. मात्र, बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना त्या मुलीच्या आई-वडिलाचा लग्नातील फोटो हाती लागला. त्या फोटोच्या मागे लग्नाची तारीख दिसत होती. १९९९ ही लग्नाची तारीख असल्याने लग्नाआधी मुलीचा जन्म कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला. फोटोवरील लग्नाच्या तारखेने पालिकेने दिलेला दाखला खोटा असल्याचे सिद्ध झाले. असे भक्कम पुरावे घेऊन पोलीस निरीक्षक फुगे यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकारी रोहिणी ढवळे, मुख्य सेविका स्वाती पथाडे, अॅड. असुंता पारधे हे गेले. मात्र, त्यांनी टाळटाळ केल्याने शुक्रवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांची या अधिकाऱ्यांनी पुराव्यासह भेट घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात आला. पोलिसांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये, अशी नोटीस बाजावली.
निनावी दूरध्वनीमुळे बालविवाह रोखला
By admin | Published: May 13, 2017 4:59 AM