पुणे : राज्याच्या नगररचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात २ कोटी ८५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती. त्यानंतर केलेल्या तपासात त्यांनी अनेक ठिकाणी बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आले असून ही मालमत्ता १०० ते १५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा संशय आहे. बेदामी संपत्ती असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली असून त्यांच्याकडून प्राथमिक तपासणी सुरु आहे.
हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय ४५), गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय २३), भास्कर हनुमंत नाझीरकर (वय २३, सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अंलकार पोलिसांकडे बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाझीरकर यांच्या मुलावर व नातेवाईकांवर बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी १७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाझीरकर हे पुण्यात रहायला असून सध्या त्यांची अमरावती येथे नियुक्ती आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात नाझीरकर यांच्या पुण्यात २ व सातारा येथे ३ मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या ३ कार, २ दुचाकी, सोन्याचांदीचे दागिने असा १ कोटी १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या तपासासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र तपास पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने केलेल्या तपासात नाझीरकर यांची मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
ही मालमत्ता नातेवाईक, मित्रमंडळींच्या नावाने घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा बेनामी मालमत्तेबाबत तपास करुन कारवाई करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आयकर विभागाला पत्र पाठविले आहे. आयकर विभागाने याचा तपास सुरु केला आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोड यांनी सांगितले की, आमच्या तपासात काही बेनामी मालमत्ता असल्याचे आढळल्याने त्याचा तपास करावा, यासाठी आम्ही आयकर विभागाला पत्र दिले आहे.
राज्यातील पहिलीच घटनाराज्य शासनाच्या एका अधिका-याविरुद्ध बेहिशोबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या बेनामी मालमत्तेच्या तपासासाठी आयकर विभागानेही एकाचवेळी तपास सुरु केला असल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. आयकर विभागाने नाझीरकर यांच्या बेनामी संपत्तीचा तपास सुरु केला आहे.