पुणे : पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेतील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयाबाहेर बुधवारी सायंकाळी एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या लाल रंगाच्या या बँगेमुळे आयुक्तालयात सुमारे एक तासभर हाच चर्चेचा विषय झाला होता.
पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगांची बॅग तेथील कर्मचाऱ्यांना दिसली़ ही नवीन असलेली ही बॅग कोणाची याची कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यावर तेथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणाचीही ती नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या बेवारस बॅगेविषयी कळवून तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बॅगेची पाहणी करुन तिच्या भोवती छोट्या संरक्षक भिंती उभारल्या़ त्यानंतर श्वानाला बोलविण्यात आले. त्याने बॅगेची तपासणी करुन त्यात काहीही संशयास्पद अथवा स्फोटक नसल्याचे संकेत दिले़ त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता या नव्या कोऱ्या बॅगेत फक्त एक ट्रे आढळून आला.
वाहतूक शाखेच्या जागेत महिला, बालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी भरोसा सेल सुरु करण्यात आला आहे़ या सेलमध्ये अनेक नागरिक येत असतात. त्यांच्यापैकी एखाद्याची ही बॅग असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.