कदमवाकवस्ती :सोशल नेटवर्किंग साइटमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकचा वापर मित्र जोडण्यात होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध होत आहे. पूर्व हवेलीतील परिसरात फेसबुकवर आलेली एखाद्या मुलीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट फेसबुक वापरणाऱ्या युझरसाठी खूप महागात पडताना दिसत आहे.
फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केली जाते. त्यानंतर चॅटिंग सुरू होते बोलणे वाढल्यानंतर व्हिडिओ कॉल वर बोलणे सुरू होते. व्हिडिओ कॉलवर झालेले अश्लील संभाषण नातेवाइकांना पाठवून बदनामी सुरू करण्याचे प्रकार सुरू होतात आणि ते न करण्यासाठी पैशाची मागणी केेली जात आहे. अशा घटनांमध्ये अनेक तरुण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. परंतु बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अनेकदा सामायिक मित्र दिसल्याने अनोळखी लोकांची रिक्वेस्ट स्वीकारली जाते. पण तसे करण्यातही धोका असल्याचे सायबरतज्ज्ञ सांगतात. फेसबुकद्वारे मैत्री करून नंतर बलात्कार करणे, आर्थिक फसवणूक करणे आदी गुन्हे देशभरात घडत असतात. यासाठी काही खबरदारीचे उपाय सायबरतज्ज्ञांनी सांगितले आहेत. फेसबुक अश्लील संभाषण जरी झालेले नसले तरी मेसेंजरच्या माध्यमातून फ्रेंड एडिट करून सदर संभाषणाला अश्लील भाग जोडला जात आहे. बदनामी करण्याची भीती दाखवत दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत पैशांची मागणी केेली जात आहे.अशाप्रकारे बदनामीच्या भीतीने तरुण तडजोड करून पैसे द्यायला तयार होताना दिसत आहेत.
--
फेसबुक अकाऊंट लॉक करणे
मागील काही दिवसांमध्ये फेसबुक प्रोफाइलवरील माहिती चोरून दुसऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बनावट अकाउंट सुरू करून मूळ व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यात आल्यानंतर फेसबुक मेसेंजरवरून भावनिक मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येते. त्यामुळे फेसबुकवरील खासगी माहिती चोरीला जाऊ नये म्हणून फेसबुक अकाउंट लॉक करून ठेवावे, तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी व ज्यांना असे फोन कॉल येत आहेत. त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपली मदत केली जाईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
-
फेसबुक अकाउंटवर आलेल्या कोणत्याही अनोळखी महिलेची फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारण्याअगोदर त्या अकाउंटची माहिती तपासा ओळखीची असल्यावरच स्वीकारा.आपले फेसबुक अकाउंट लॉक करा जेणेकरून आपली प्रोफाइल कोणी उघडून त्यातील फोटोचा गैरवापर करू शकणार नाही.
- डॉ. सई भोरे पाटील,
उपविभागीय अधिकारी, पुणे ग्रामीण