पिंपरी : सुमारे १६ एकर क्षेत्रावर १२ उद्याने विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची संख्या १६९ वर पोहोचणार आहे. आतापर्यंत ३५० एकर जागेवर छोटी-मोठी १५७ उद्याने महापालिकेने विकसित केली आहेत. अजंठानगरमधील तुळजाईवस्ती, यमुनानगर, सांगवीतील मधुबन कॉलनी, ताथवडे,कासारवाडी, वैदुवस्ती, इंद्रायणीनगर, गव्हाणेवस्ती, लांडेवाडी, मासुळकर कॉलनी येथील प्रत्येकी एक, तर कृष्णानगरमध्ये दोन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. इंद्रायणीनगरमध्ये वॉटर पार्कचे नियोजन आहे. भोसरी सहल केंद्र, पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यान, सांगवीतील शिवसृष्टी, कासारवाडीतील संगीत कारंजे उद्यान यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण उद्याने महापालिकेने उभारली आहेत. रस्ते सुशोभीकरणावरही महापालिकेने भर दिला आहे. शोभेच्या झाडांची लागवड करून ४१ ठिकाणी रस्ते सुशोभीकरण व वाहतूक बेटे विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने २३ पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. संभाजीनगर येथील बहिणाबाई प्राणिसंग्रहालय (सर्पोद्यान), बर्ड व्हॅली पार्क, बालनगरी, गुलाबपुष्प उद्यान, पर्यावरण संस्कार केंद्र, भोसरी सहल केंद्र, सफारी पार्क, सायन्स सेंटर, प्रस्तावित सिटी सेंटर, पिंपळे गुरव येथील उद्यान, स्वर्गीय तानाजी शितोळे उद्यान, सावित्रीबाई फुले उद्यान, थेरगाव बोट क्लब , मोरया गोसावी मंदिर, वीर सावरकर उद्यान, अप्पूघर, दुर्गादेवी टेकडी, डीअर पार्क, भक्ती-शक्ती उद्यान आदींचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)
आणखी १२ उद्याने विकसित होणार
By admin | Published: May 16, 2014 4:30 AM