पुणे : नायलॉन मांजाने दोन पोलीस जखमी झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी देखील दुपारी एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा गळा कापला गेला. सुदैवाने तो बचावला असून, गळ्याला दहा टाके घातले आहेत. नवनाथ मांढरे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मकरसंक्रांतीला बंदी असतानाही नायलॉनचे मांजे सर्रास वापरले जातात. त्यामुळे पक्षी व नागरिकही जखमी होतात. अनेकदा जीवही गमवावा लागतो. मंगळवारी देखील शहरात पतंगबाजी सुरू होती. त्याचा फटका अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला बसला आहे. नवनाथ मांढरे हे दुपारी दोन वाजता भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्रात आले हाेते. त्यानंतर त्यांना ड्युटीसाठी कोंढव्याला पाठविण्यात आले. ते कोंढव्याकडे जाताना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर दुचाकीवर होते. पुलाच्या मधोमध गेल्यानंतर त्यांना समोरून मांजा गळ्यावर आला. गाडी थांबवेपर्यंत त्यांचा गळा कापला होता. त्यांच्या गाडीचा वेग कमी होता, म्हणून ते बचावले. त्यानंतर त्यांनी अग्निशमन कर्मचारी गणेश ससाणे यांना फोन केला. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना बिबवेवाडी येथील रूग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्या गळ्यावर दहा टाके घालण्यात आले.
मकरसंक्रांतीला नायलॉन मांजाने २ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते
मकरसंक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजी केल्यामुळे धनकवडी परिसरात दोन पोलिस जखमी झाल्याची घटना रविवारी घडली होती. हा अपघातपुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला होता. महेश पवार आणि सुनील गवळी अशी गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस आहेत. रविवारी दुचाकीवरून ते जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने महेश पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली, तर त्यांच्यासोबत असलेले सुनील गवळी यांचा हात मांजाने कापला गेला. पक्षिमित्र बाळासाहेब ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.