पुणे : नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले होते. तर ४८ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. सातत्याने अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
तर आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा कंटेनर कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.
नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे.
सातारा-मुंबई महामार्गावरील नवले पुलावर सातत्याने अपघात होतात. त्याची कारणे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली गेली होती. त्या समितीने अभ्यास करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या, त्या योजना महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्णही केल्या; तरीही रविवारी भीषण अपघात झाला. यावरून समिती सपशेल नापास झाल्याचे स्पष्ट आहे. तिने अपघात रोखण्यासाठी काही किरकोळ उपाय सुचविले होते. त्यात प्रामुख्याने वाहनांची वेगमर्यादा कमी करण्यासाठीचेच अधिक उपाय दिले होते. परंतु आज झालेल्या अपघाताने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.