पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले. यात पुण्यातील लोहगाव आणि कोल्हापूर येथील नवीन टर्मिनलचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली असून पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ आणि कार्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यातून लाखो रोजगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.
लोहगाव विमानतळ येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यास अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपुरे होते. यामुळे नव्याने टर्मिनल उभे राहिले आहे. विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.
पुण्यात अतिरिक्त विमानसेवा सुरु करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय विमानांना परवानगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी होत आहेत. म्हणूनच, पुण्याला एक नवीन एअरपोर्ट तयार करायंच आहे. पुरंदरला ते नवीन विमानतळ तयार करायचं आहे. केंद्र सरकार आणि संरक्षण विभागाच्या सर्व परवानग्या आपण घेतल्या आहेत. परंतु, मागील सरकारमध्ये हे विमानतळ आणखी २० किमी पुढे नेण्याचा विचार सुरू होता. मात्र, ती जागा योग्य नसल्याचे लक्षात आल्याने आता आपल्या सरकाराने पुरंदरलाच विमानतळ करण्याचा निर्णय घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
जीडीपीत २ टक्के वाढ
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुर होईल. केवळ विमानतळच नाही तर, विमानतळ आणि कार्बो टर्मिटल, अशा प्रकारचं एक मोठं कमर्शियल सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल, असेही देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुढील ५ ते ६ वर्षात नवं एअरपोर्ट निर्माण केल्यास पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा माझा दावा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.