ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 - पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यात पैसे नसताना यूपीआय अॅपद्वारे पैसे काढून अपहार केल्याप्रकरणातील आणखी एकाला पुणे गुन्हे शाखेच्या सायबर सेलने मंगळवारी अटक केली.
गणेश मारुती डोमसे (वय ३५, रा़ तेजेवाडी, ता़ जुन्नर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अपहार केल्याची रक्कम ६ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे. डोमसे याने जुन्नर तालुक्यातील १० शेतकऱ्यांना तुमच्या बँक खात्यात पंतप्रधान योजनेतून ५ हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन सीमकार्ड घेतले. ते त्यांनी यातील फरारी आरोपी विनोद नायकोडी, स्वप्नील विश्वासराव यांच्याकडे दिले. त्यांनी या १० बँक खात्यांमार्फत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार केला आहे. महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून यूपीआय अॅपद्वारे काढण्यात आलेल्या पैशांपैकी सर्वाधिक पैसे या १० जणांच्या खात्यातून काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात यापूर्वी राजेश काबरा (वय ४७, रा़ हडपसर), पंकज राजेंद्र पिसे (वय २८, रा़ धायरी), अशोक बबनराव हांडे (वय ४९, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (वय ४१, रा. मढ, ता. जुन्नर), संतोष प्रकाश शेवाळे (वय ३७, रा. शिक्रापूर, ता. शिरुर), आनंद लाहोटी (रा़ हडपसर) आणि किरण गावडे यांना अटक करण्यात आली आहे़ अधिक तपासासाठी त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार अधिक तपास करीत आहेत.