केडगाव : उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गटासाठी पुणे ग्रामीणमधुन मोठा धक्का मानला जात आहे.
पासलकर यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, सध्या आपल्याच पक्षातील काही वरिष्ठांनी पक्ष संपवायची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. त्या नुसार चांगले पक्षवाढीचे काम करणा-यांचे खच्चीकरण केले जात आहे. याबाबत आपणांस पण वेळोवेळी कल्पना दिलेली होती. परंतू आपणाकडूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. असा आरोप करत पासलकर यांनी राजीनामा दिला आहे.
अर्थात पासलकर यांचा बोलण्याचा रोख खासदार संजय राऊत यांच्याकडे आहे. सध्या दौंड तालुक्यामध्ये गाजत असलेल्या दौंड तालुका बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला राष्ट्रवादीने समाविष्ट न केल्याने पासलकर व जिल्हा बॅंकेचे संचालक रमेश थोरात यांच्यामध्ये मतभेद झाले होते. बाजार समिती ठाकरे गटाला समाविष्ट न केल्याने पासलकर यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी व रमेश थोरात यांचे विरोधात रान उठवले होते. ठाकरे गटाला समाविष्ट करून घेतले नसल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस मनी लॉन्ड्री घोटाळ्यासंदर्भातील आगामी २६ एप्रिल रोजी स्वतःची होणारी वरवंड या.दौंड येथील नियोजित सभा रद्द करण्यात यावी अशी मागणी पासलकर यांनी केली होती. पासलकर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत राऊत यांनी रविवार दिनांक २३ रोजी मी भीमा पाटस विरोधातील सभेला येणार असल्याचे आज मीडियावरती जाहीर केले. त्यामुळे पासलकर यांनी यावरून तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आगामी काळामध्ये पासलकर यांनी पाठवलेल्या राजीनामा अर्जावर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.