६३ हजारांचे बनावट व्यवहार दाखविले
बारामती : बारामतीतील तीन आडतदारांच्या नावच्या बनावट पावत्या एसीबीकडे सादर करत त्याद्वारे सुमारे आठ लाख ६३ हजारांचे बनावट व्यवहार दाखविल्याप्रकरणी नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर व त्यांच्या पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: याबाबत शहर पोलीस ठाण्यात संदीप वसंतराव गदादे (रा. मळद, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बारामतीत संजय वसंतराव गदादे व संदीप वसंतराव गदादे हे फळ व भाजीपाल्याचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांची उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यानुसार विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. चौकशी सुरू असताना बारामतीतील तीन आडतदारांकडील पावत्या नाझीरकर यांनी सादर केल्या होत्या. एसीबीकडून चौकशीकामी बोलावण्यात आल्यानंतर गदादे हे दोन महिन्यांपूर्वी पुणे कार्यालयात गेले. यावेळी सन २०१२-१३ या कालावधीत त्यांच्या आडत दुकानाच्या ३८ बोगस पावत्या नाझीरकर यांनी एसीबीकडे सादर केल्याचे दिसून आले. या पावत्यांवर इंग्रजीत आकडे मांडलेले होते. शिवाय बाजार समितीचा कोणताही शिक्का ,तसेच आडत दुकानदारांच्या सह्या नव्हत्या. गदादे यांच्याकडे मिरची, काकडी, दोडका, फ्लॉवर आदी ६ लाख ७७ हजार रुपयांचा शेतमाल विक्री केल्याचे या पावत्यांवरून दाखविण्यात आले होते. परंतु नाझीरकर यांच्याकडून कोणताही शेतमाल गदादे यांनी खरेदी केलेला नाही. तसेच ते त्यांना ओळखतही नसल्याची माहिती पुढे आली आहे.
गदादे यांनी एसीबी कार्यालयात अधिक माहिती घेतली असता, बारामतीतील केशवराव बाबूराव मचाले आणि सुनील बबनराव बनकर या आडतदारांकडील अशाच बनावट पावत्या जोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यात या दोघांकडे सोयाबीन, शेवगा, वांगी विक्री केल्याचे तर दाखविण्यात आले होते. मचाले यांच्याकडील तीन पावत्यांवर १ लाख ४९ हजार ५४५ तर तर बनकर यांच्याकडील १९ पावत्यांद्वारे ३६, ४७७ रुपयांचा शेतमाल विकल्याचे दाखवण्यात आले होते. या तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी नाझीरकर दांपत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक असलेल्या नाझीरकर यांच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातच त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महाबळेश्वरातून अटक केली आहे.
...त्यानंतर नाझीरकरांवर
आणखी एक गुन्हा दाखल
नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर व त्यांच्या पत्नी संगीता, मुलगी गीतांजली यांच्यासह सहाजणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी २७ डिसेंबर रोजी फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करत फसवणूक केल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यासह सहाजणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्यानंतर सोमवारी(दि. २६) नाझीरकरांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.