लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवजयंती साजरी करण्याच्या नावाखाली गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे.
रोशन लोखंडे, अनिकेत बावस्कर, फौजल काझी, प्रसाद धावडे आणि वैभव तिडके (सर्व रा़ नºहे) यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी धायरी येथील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या साईटवर काम करीत होते. त्यावेळी ५ जण त्यांच्याकडे आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून शिवजयंतीसाठी वर्गणीच्या नावाखाली त्यांच्याकडून जबरदस्तीने १० हजार रुपये काढून घेतले. तसेच परिसरातून येणारे जाणारे नागरिक व दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत़
सिंहगड रोडवर दुकानदारांना धमकावून भर रस्त्यात डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांना पकडले आहे.