पुणे : महापालिकेतील कामे मिळवून देतो, असे सांगून ठेकेदारांकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन घेण्यासाठी भाजप नगरसेवकाने ठेकेदाराचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने लघवीचा बहाणा करुन कोर्टातून पलायन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.निखील रत्नाकर दिवसे (वय ३२, रा. घोरपडी पेठ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक धनराज घोगरे, सहदेव लक्ष्मण ढावरे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), सुरेश तेलंग, विनोद माने पाटील, अॅड. अतुल पाटील, तसेच घोगरे यांच्या कार्यालयात काम करणारे इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेत काम मिळवून देतो, असे सांगून नगरसेवक घोगरे यांनी निखील दिवसे यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. त्यांनी काम मिळवून न दिल्याने शेवटी दिवसे यांनी पैसे परत मागितले. तेव्हा घोगरे व इतर चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याबाबत बोलण्यासाठी सहदेव ढावरे याने फिर्यादीला फोन करुन पर्वती दर्शनला बोलावून घेतले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिवसे तेथे गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यांना मोटारसायकलवरुन अॅड. अतुल पाटील यांच्या कार्यालयात नेले. तेथे अगोदरच तयार केलेल्या अॅफिडेव्हिटवर सह्या घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वापरण्यासाठी त्यांना शिवाजीनगर कोर्टात आणले.
फिर्यादी यांनी कोर्टातील नाझर यांना ते अॅफिडेव्हिट त्यांचे नाही तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी भिती दाखवून दमदाटी करुन जबरदस्तीने करुन घेतले आहे, असे सांगितले. व लघवीचा बहाणा करुन दिवसे तेथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या तावडीतून पळून गेले. दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सहदेव ढावरे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे अधिक तपास करीत आहेत.