पुणे : औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात तक्रारदार पुढे येऊ लागल्याने आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. गायकवाड यांनी तक्रारदाराकडून प्रतिमहिना ४ टक्के व्याजदराने दिलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच रकमेची मुददल दिली नाही. म्हणून को-या कागदावर सहया घेत त्यांची मर्सिडिज जबरदस्तीने मुलीच्या नावावर करून घेतली. रक्कम फेडल्यानंतर गाडी परत मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला बंदुकीतील तीन गोळ्या हवेत झाडून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलीसह राजू दादा अंकुश आणि ड्रायव्हरवर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे निलख येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. २०१७ ते २०२१ द़रम्यान हा प्रकार घडला. फिर्यादीला व्यवसायासाठी पैसे लागत असल्याने त्यांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून २९ लाख रूपये प्रतिमहिना ४ टक्के व्याजाने घेतले. फिर्यादी रकमेचे व्याज गायकवाड यांच्या घरी जाऊन देण्यास तयार असतानाही ते फिर्यादीच्या घरी गेले. आणि रकमेची मुददल दिली नाही म्हणून सिक्युरिटीकरिता मर्सिडीज बेंज घेऊन गेले.
फिर्यादीने सहा महिन्यांनी मुददल दिली नसल्याच्या कारणास्तव फिर्यादीला घरी बोलावून मर्सिडीजची कागदपत्रे आणि को-या टीटी फॉर्म व चेकवर २५ लाख रकमेच्या सहया घेत गाडी नावावरून देखील करून घेतली. व्याज आणि मुददल असे मिळून ३२ लाख रूपये देऊन मर्सिडिज गाडी परत घेण्यासाठी गेले असता फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने बंदुकीतील ३ गोळ्या हवेत झाडून धमकी देण्यात आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.