पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील ( Aryan Khan Drugs Case) पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) यांने नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. किरण प्रकाश गोसावी (रा. सानपाडा), त्याचा सहकारी आणि कुसुम गायकवाड (रा. कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ( Pune Police) किरण गोसावी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (वय ४८, रा. महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
किरण गोसावी याने फिर्यादी व त्यांचे इतर दोन मित्रांची १३ नोव्हेबर २०१८ मध्ये क्रोम मॉल चौक येथे भेट घेतली. त्याच्याबरोबर एक सहकारी व कुसुम गायकवाड हे होते. मलेशिया अथवा परदेशात नोकरी लावण्याबाबत वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन विश्वास संपादन केला. त्यांनी तिघांना मलेशिया येथे ५५ हजार रुपये दरमहा पगाराची नोकरी लावून देतो. व्हिसा, हॉटेलचे बुकींग व इतर सोयीसुविधा करुन देतो, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून रोख ५५ हजार रुपये व बँक खात्यातून ९० हजार रुपये असे १ लाख ४५ हजार रुपये घेतले. मलेशिया येथे जाणेसंबंधीचे अर्धवट कागदपत्रे व विमान तिकीट व वास्तव्याचे बुकींगचे कागदपत्रे दिली. ही कागदपत्रे अर्धवट असल्याने त्यांना तेथे जाण्यास अडचण निर्माण झाली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी पुन्हा त्यांना मलेशियाला पाठवावे अथवा पैसे परत द्यावे, यासाठी गोसावीच्या कार्यालयात जाऊन ते भेटले. तेव्हा त्याने पिस्तुल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन आतापर्यंत तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समजल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.