पुणे : देणेकऱ्यांच्या तगद्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून तब्बल ३३ दिवस बेपत्ता झालेले व पुणेपोलिसांनी जयपूरहून शोधून आणलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी येथील यिनयांग प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर पतसंस्थेतून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रोड), मंगेश अनंतराव गोळे (रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय ६१, रा. वडनेर, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पाषाणकर व मंगेश गोळे हे प्रॉक्सिमा क्रिएशन चे भागीदार आहेत. त्यांनी खराडी येथील यिनयांग प्रोजेक्ट येथील बिल्डिंग सी मधील फ्लॅट नंबर ९०२ हा ठाकोर यांनी १ कोटी ५६ लाख ६३ हजार ९८७ रुपयांना २०१५ मध्ये खरेदी केला होता. तसा करार करण्यात आला होता. मात्र, पाषाणकर व गोळे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच महिंदर परसराम मनसे (रा. गिता सोसायटी, कॅम्प) यांनी फ्लॅट सी ८०२ हा ८१ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केला होता. या दोघांनाही फ्लॅटचा ताबा देण्यापूर्वी त्यांच्यावर व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था, सांगली यांच्याकडून २ कोटी रुपये कर्ज काढून फियार्दी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
खराडी येथील या प्रकल्पातील याच सी बिल्डिंगमधील पी १०१ व १०२ हे फ्लॅटबाबत नरेंद्र पाटील यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.