पुणे : प्रतिष्ठित उद्योजक नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि गणेश नानासाहेब गायकवाड या पितापुत्रावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी पिंपरी आयुक्तालयाने संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का)गायकवाड पिता-पुत्रावर कारवाई कारवाई केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात आता अनेक तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. याबाबत स्वप्निल गणपतराव बालवडकर (36, रा. क्लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर हे व्यावसायिक असून, त्यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी व्यवसायासाठी 2016 ते मे 2017 मध्ये 2 कोटी रुपये गायकवाड यांच्याकडून दोन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच 2017 मध्ये 1 कोटी 4 टक्के व्याजाने घेतले होते. नंतर 2018 मध्ये 55 लाख 4 टक्के व्याजने दिले. तेव्हा त्याने व्याज जर वेळेवर दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपीचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख व गायकवाड यांच्या घरी जाऊन 3 कोटी 40 लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते. यासर्व व्यवहारात गायकवाड यांनी बालवडकर यांची 8 गुंठे जमीन लिहून घेतली. तसेच सावकारी करताना त्यांनी व्याज रोख स्वरूपात घेऊन मुद्दल बँक खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.------------------------------