पुणे : नागरिकाला धमकावून रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी विनापरवाना गर्दी जमवून वाहतुकीला अडथळा करून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्याप्रकरणी गजानन मारणे टोळीतील रूपेश मारणे व त्याच्या साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
रूपेश मारणे याच्यासमवेत नितीन साळुंखे, निखिल साळुंखे, सागर पासलकर (तिघेही रा. हमराज चौक, कोथरूड), अभिजित ज्ञानेश्वर गाडे (वय ३५, रा. शिक्षकनगर, कोथरूड) व त्यांचे इतर २० ते ३० साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी अभिजित गाडे याला अटक केली आहे.
रूपेश मारणे व त्याच्या साथीदारांनी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दुचाकीने येऊन लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडिया येथे येऊन तेथून दगडूशेठ मंदिर येथे २० ते ३० जणांसमवेत जाताना नागरिकांना व वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांना त्रास होईल, अशा पद्धतीने चालत जाऊन दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बाबू गेनु गणपती मंडळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असताना तोंडाला मास्क न लावता व कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गाडे याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील अधिक तपास करीत आहे.