पुणे : नागरिकाला धमकावुन रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी विनापरवाना गर्दी जमवून वाहतूकीला अडथळा करुन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्याप्रकरणी गजानन मारणे टोळीतील रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
रुपेश मारणे याच्यासमवेत नितीन साळुंखे, निखिल साळुंखे, सागर पासलकर (तिघेही रा. हमराज चौक, कोथरुड) अभिजित ज्ञानेश्वर गाडे (वय ३५, रा. शिक्षकनगर, कोथरुड) व त्यांचे इतर २० ते ३० साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या पैकी अभिजित गाडे याला अटक करण्यात आली आहे.
रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांनी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दुचाकीने येऊन लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडिया येथे येऊन तेथून दगडुशेठ मंदिर येथे २० ते ३० जणांसमवेत जाताना नागरिकांना व वाहतूकीस अडथळा निर्माण करुन त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने चालत जाऊन दगडुशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बाबु गेनु गणपती मंडळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असताना तोंडाला मास्क न लावता व कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केल्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडे याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील अधिक तपास करीत आहे.