लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोष करत जंगी मिरवणूक काढून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर पोलिसांनी एकामागोमाग गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. वारजे पोलीस ठाण्यात काल (दि.१७) रात्री आणखी एक गुन्हा दाखल केला.
तळेगाव दाभाडे, कोथरूडमध्ये गजानन मारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ वारजे पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करताना त्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम समाविष्ट करण्यात आले.
पुणे - बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात १५ फेब्रुवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजता सराईत गुन्हेगार गजानन मारणे याने त्याचे साथीदार जमवले आणि त्यांना घेऊन जात होते. वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना थांबवून कोविड -१९ या अनुषंगाने परवानगी घेतली का ? याबाबत विचारणा केली होती. तेव्हा आरोपी संतोष शेलार याने वाहनामधून हात काढून सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना हाताने बाजूला ढकलले आणि ‘नाही’ असा इशारा केला. तिथे न थांबता शेलार पुढे निघून गेले. तसेच, रेकाॅर्डवरील गुन्हेगार गजानन मारणे व त्याचे इतर समर्थक यांनी दहशत निर्माण करून पुणे-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौक येथून कोथरूडच्या दिशने न थांबता निघून गेले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोविड -१९ सारख्या भयंकर जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने तोंडाला मास्क न लावता सुरक्षित अंतर न ठेवा आजाराचा प्रसार करण्यास मदत केली म्हणून गजानन मारणे याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.