Pune Accident News : पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणानंतर मद्यपान करुन गाडी चालवून अपघात झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच पुणे शहरात एका धनधांडग्याच्या मुलाने भरधाव वेगात एसयूव्ही कार चालवून टेम्पोला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेत टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजदेखील आता समोर आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात घडला. शरद पवार गटाचे नेते आणि माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने मद्यपान करुन भरधाव वेगात एसयूव्हीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनरसह सौरभही जखमी झाल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सौरभ दारूच्या नशेत होता आणि तो राँग साईडने गाडी चालवत होता.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सौरभ गायकवाड दारूच्या नशेत असताना टेम्पोला इतक्या जोरात धडक दिली की त्याच्या गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.
टेम्पो चालक दिपक बाबुराव हिवराळे यांनी याप्रकरणी तक्रार केली असून तेच अपघाताच्या वेळी कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवत होते. कोंबड्या वाहून नेणारी गाडी चालवत १६ तारखेला पहाटे पाचच्या सुमारात मुंढव्यावरून मांजरीकडे जात होतो. यावेळी समोरून एक गाडी येत होती. ही गाडी राँग साईडने येत होती. या गाडीने आमच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे माझ्यासोबत असलेला क्लिनर राजा शेख असे आम्ही दोघेही जखमी झाले. समोरून येणाऱ्या गाडीचा नंबर MH12TH0505 होता आणि ही गाडीत सौरभ गायकवाड होता, असे हिरवळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हिवराळे यांच्यावर मांजरीतील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.