काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 18:33 IST2025-04-17T18:33:20+5:302025-04-17T18:33:52+5:30

थोपटे भोर वेल्हे मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला

Another Congress subedar at BJP's throat..! Sangram Thopte will enter; MLA Rahul Kul mediates | काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

पुणे: नव्या प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी सुरू असताना काँग्रेसला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसला. भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. थोपटे याविषयी स्पष्टपणे काही बोलले नाहीत, मात्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात येत्या काही दिवसातच ते याची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे मित्र असलेले दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल यांनी यासाठी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे.

थोपटे यांनी ‘लोकमत’ बरोबर बोलताना सांगितले की आमचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक मेळावा होता. तो झाल्यानंतरच मला याविषयी समजले. माझ्याकडून मी याचे एकदोन दिवसात स्पष्टीकरण देईल. प्रवेश करणार की नाही याविषयी स्पष्टपणे बोलण्याचे थोपटे यांनी टाळले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून थोपटे यांच्या प्रवेशाला दुजोरा देण्यात आला. ‘त्यांचा निर्णय झाला आहे, मात्र ते प्रवेश करत नाहीत तोपर्यंत आमचेच आहेत’ असे प्रदेश कार्यालयातील एका जबाबदार नेत्याने सांगितले.

थोपटे भोर वेल्हे मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचे वडिल अनंतराव थोपटे हेही त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. संपूर्ण घराण्याला काँग्रेसची पार्श्वभूमी असतानाही थोपटे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दौंडचे आमदार राहूल कूल यांनी त्यांचे मन वळवल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळेच थोपटे यांनी तसा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात थोपटे यांचे नाव वारंवार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. त्यानंतरच्या निवडणूकीत थोपटे यांचा पराभव झाला. पक्षापासून ते तेव्हापासून बाजूलाच झाले होते. त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Web Title: Another Congress subedar at BJP's throat..! Sangram Thopte will enter; MLA Rahul Kul mediates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.