लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अधिक परताव्याचे आमिष दाखवून १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक सखाराम कोहकडे यांच्यासह सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवींचे अकरा करारनामे करून अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बांधकाम व्यावसायिक संदीप सुधीर जाधव (वय ४०, रा. सिंधू बंगलो, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. डी. एस. के. अँड असोसिट्सचे भागीदार दीपक सखाराम कोहकडे, पत्नी भारती दीपक कोहकडे, मुलगा अश्विनीकुमार दीपक कोहकडे (सर्व रा. सोपनबाग, बालेवाडी), दीपक कोहकडे यांचा मेहुणा अनंता भिकुले (रा. बालेवाडी), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह स्नेहल ओसवाल (रा. ईथुपिया डिव्हाईन, रुबी हॉल क्लिनिकजवळ, वानवडी), भागीदार हर्षद अशोक कुलकर्णी (रा. वूडलँड रेव्हेन्यू, गांधीभवन, कोथरूड), नोटरी आशिष ताम्हाणे (रा. बाणेर) व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी एका ओळखीच्या इसमाच्या मार्फत कोहकडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी ज्यादा परताव्याच्या आमिषाने मोठ्या रकमेच्या मुदतठेव रकमा स्वीकारल्या. काही ठेवींवर त्यांनी चांगला परतावा दिला. आणखी जादा रकमेच्या ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेव रक्कमेचे आठ वेगवेगळे नोटराईज करारनामे केले.
करारनाम्याप्रमाणे गुंतविलेल्या रकमेवर परतावा दिला नाही. पूर्वीचे करारनामे रद्द करीत नववा करारनामा करीत आकर्षक परतावा आणि मुद्दल देण्याचे कबूल केले. असे एक अकरा करारनामे केले. ठेवी परत न करता १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. या रकमेद्वारे देशविदेशात मालमत्ता खरेदी केली. तसेच कोहकडे यांना काही झाल्यास अथवा त्यांचा मृत्यू आल्यास त्याला फिर्यादी जबाबदार असतील. हाच मृत्यूपूर्व जबाब असेल अशी नोटीस वकिलामार्फत पाठवून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.