पुणे: बंद असलेली गोदामे, हॉटेलचे भटारखाने यांना आग लागल्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पहाटे पुन्हा पुणे -सोलापूर रोडवरील लोणी काळभोर येथील बोरकर वस्तीमध्ये असलेल्या सुरक्षा डोअर या लाकडी सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील सर्व सामान जळून खाक झाले. आग लागली तेव्हा तेथे कोणीही नसल्याने दुर्घटना टळली.
लोणी काळभोर मधील बोरकर वस्तीमध्ये सुरक्षा डोअर हे घरांसाठी सेफ्टी डोअर बनविणार्या कंपनीचे गोदाम आहे. गोदाम बंद असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोदामामधून धूर येत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहून अग्निशमन दलाला कळविले. गोदामाच्या मागच्या बाजूला आग लागली होती. पुणे व पीएम आरडीए अग्निशमन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी गोदामाच्या मागच्या भागाचे पत्रे उचकटले, खिडकीतून पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.
गोदामातील तयार साहित्य तसेच कंटिंग मशीन व अन्य यंत्रसाम्रुगी या आगीत जळून खाक झाली. गोडावून बंद असल्याने नेमकी आग कशी लागली याचे कारण समोर येऊ शकले नाही. वीज पुरवठ्यातील ओव्हर लोड, कमी दर्जाच्या वायरचा वापर यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.