पुणे : गर्भवती महिलेचा बळी घेणाऱ्या दीनानाथ रुग्णालयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने २०१९-२० पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा कर थकवला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याचे आरोप केले आहेत. या घटनेनंतर दीनानाथ रुग्णालयाचे एक एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकतकर थकविल्याचे समोर आले आहे. नागरिकांची लूटमार करून, अवाजवी पैसे रुग्णालय घेत आहे. हे पैसे पैशांशिवाय उपचारही करून दिले जात नाहीत. अशी अनेक रुग्णांची तक्रार आहे. तरीही रुग्णालयाने मिळकतकर थकवला असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
उपचारासाठी १० ते २० लाखांच्या खर्चाची कल्पना
रुग्ण, पती व नातेवाईक शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. तपासणीवेळी रुग्णाची प्रकृती सामान्य होती. कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. तरीही जोखमीची अवस्था लक्षात घेता देखरेखीकरिता रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. ७ महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत, सिझेरियन विभागातील उपचारासाठी १० ते २० लाखांच्या खर्चाची कल्पना दिली. यावर तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो, असे सांगत महिलेच्या पतीने डॉ. केळकर यांना फोन करून आपली अडचण सांगितली. त्यावर डॉ. केळकर यांनी जमतील तेवढे पैसे भरा, मी डॉ. घैसास यांना सांगतो, असे सांगितले.
महापालिकेनेही बजावली नोटीस
महाराष्ट्र राज्य सरकारने १४ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील नियम ११ (जे) मधील अनु क्र. १ ते ३ पालन करण्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून, दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२२मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा, असे नोटीसीत नमूद केले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी ही नोटीस बजावली आहे