पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करणे तसेच मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी पकडण्याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यावरून रविवारी (२३ मे) लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथकाने हडपसर पोलीस ठाण्यास मोक्का कलमातंर्गत हवा असलेला, परंतु गेले ३ महिन्यांपासून फरारी आरोपी शुभम कामठे यास शिताफीने पाठलाग करून पिस्तुलासह अटक केली होती.
कामठे याचा दुसरा साथीदार शुभम भाउसो बरकडे (वय २३, रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) हा अद्यापही फरारी होता. गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अमित साळुके यांना बरकडे हा बुधवारी (२६ मे) सकाळी कोळपेवस्ती लोणी काळभोर येथील त्याचे राहत्या घराच्या परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली. सदर बाबतची माहिती त्यांनी तपास पथकप्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना दिली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, दिगंबर साळुके, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांना सोबत घेतले व मिळाले बातमीनुसार सदर परिसरात वेशांतर करून सापळा रचला. काही वेळाने फरार शुभम बरकडे हा त्या परिसरात पोहोचला. पोलीस पथकाची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पाठलाग करून जेरबंद करण्यात आले.
बरकडे याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन येथे यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याबाबत २ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पुढील कार्यवाहीसाठी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, नम्रता पाटील, हडपसर विभाग सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने केली आहे.