लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर, फरार असलेल्या दुसऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
शुभम भाऊसो बरकडे (वय २३, रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. भेकराईनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी रोहन इंगळे गेले होते. या वेळी शुभम कामठे, शुभम बरकडे व इतरांनी एटीएम सेंटरमध्ये घुसून इंगळे यांना काेयत्याचा धाक दाखवून बाहेर आणले. या वेळी जमलेल्या लोकांना कोयते दाखवून कोणालाही जिवंत सोडणार नाही, असे धमकाविले. त्यामुळे परिसरातील नागरिक पळून गेले. त्यानंतर त्यांनी इंगळे याला कोयत्याने मारहाण करून जबर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सर्वांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर शुभम कामठे व शुभम बरकडे गेले ३ महिने फरार होते. हडपसर पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. तो पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंजूर केला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी २३ मे रोजी शुभम कामठे याला पिस्तुलासह पकडले होते. त्यानंतर बरकडे याचा शोध घेत असताना २६ मे रोजी सकाळी शुभम हा कोळपेवस्ती येथील राहते घराच्या परिसरात येणार असल्याची मािहती पोलीस नाईक अमित साळुंके यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, दिगंबर साळुंके, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राेहिदास पारखे या पथकाने सापळा लावला. शुभम तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. शुभम बरकडे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.